परिसरातील प्रेक्षणीय स्थळे

परिसरातील प्रेक्षणीय स्थळे



  श्रमशक्ती स्मारक

        एवूत्र्ण ७६० कि.मी.लांबीचा कोकण रेल्वेचा महत्वकांक्षी प्रकल्प दऱ्या डोंगरातून वाट काढत शेकाडो अभियंते आणि कामगार यांनी प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत पूर्ण केला. अशा वेळी अनेक छोटे मोठे अपघात झाले. अनेकांना आपले प्राण ही गमवावे लागेले. त्याची स्मृती स्मारकरुपाने रत्नागिरी रेल्वे स्थानकासमोर जपलेली आहे. उंच त्रिकोणाकृती काळ्या संगमरवरी टोकदार स्तंभावर त्या सर्वांची नावे कोरण्यात आली आहेत.

  आशियातील सर्वात उंच रेल्वेपुल - पानवल

        रत्नागिरी हातखंबा मार्गावर रत्नागिरी पासून ९ कि.मी. अंतरावर पानवल गावाकडे जाणारा रस्ता आहे. तेथून सुमारे ४ कि.मी. अंतरावर हा पुल आहे. पुलापर्यंत जीप / सुमो सारखे वाहन जावू शकते. अन्यथा ३ कि.मी. अंतरापर्यंत वहान नेवून तेथून पुढे अर्धा तास चालत जावे लागते. हा आशियातील सर्वात उंच पूल आहे. त्याची उंची ६५ मिटर आहे. पुलावर जावून त्याच्या आधारखांबांभोवती असलेल्या छोट्या गॅलरीतून खालची खोल दरी आणि सभोवतालचा परिसर अतिशय सुंदर दिसतो.

  करबुडे - कोकणरेल्वेचा बोगदा

        निवळी फाट्यापासुन गणपतीपुळेकडे जाताना ५ कि.मी. वर उजवीकडे करबुडे गावाचा फाटा लागतो. या रस्त्याने उक्षी फाटयावरुन डावीकडे लाजूळ ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत थेट मोटाररस्ता आहे. तेथे आमराईपाशी वाहन थांबवून उजवीकडे उताराच्या कच्च्या रस्त्याने सुमारे वीस मिनिटे चालत गेले की रेल्वेमार्गावर पोहोचता येते. या अत्यंत दुर्गम ठिकाणी आशिया खंडातील सर्वांत मोठा ६ कि.मी. लांबीचा बोगदा आहे.कोकणातील डोंगर दऱ्यातुन रेल्वे धावेल ही स्वप्नवत वाटणारी कल्पना आपल्या भारतीय अभियंत्यांनी प्रत्यक्षात उतरवण्याची करामत वेत्र्लेली आहे. या बोगद्यामधुन हवा खेळती राहण्यासाठी मोठ मोठे उच्छवास असून त्याची प्रचंड टर्बाइन्स डोंगरावरुन जाणार्‍या गणपतीपुळे रस्त्यावर पाहता येतात. या बोगद्याची खरी मजा रेल्वेमधून जाताना येते. बोगदा बाहेरुन पाहताना बोगद्यातील अंधारात चालत जाणे, रुळांवर रेंगाळणे इत्यादि गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात.

  श्री स्वामी स्वरुपानंद समाधी मंदिर

        रत्नागिरीपासुन २० कि.मी. वर पावस या छोटयाश्या गावी आधुनिक काळातील थोर साक्षात्कारी संत व कवी सदगुदरु स्वामी स्वरुपानंद यांचा जन्म १५ डीसेंबर १९०३ साली झाला. त्याचे पुर्ण नांव रामचंद्र विष्णू गोडबोले असे होते. म.गांधीच्या आवाहनानुसार त्यानी कॉलेज शिक्षण सोडून स्ववलंबन, राष्ट्रीय शिक्षण, सुतकताई, स्वदेशी या चतुःसुत्रीला अनुसरुन पावस येथे राष्ट्रीय शाळा काढली. वयाच्या २० वर्षी त्याना सदगुरु गणेशनाथ तथा बाबा महाराज वैद्य यांचा अनुग्रह झाला. शिक्षण काळातच त्यांनी ब्रिटीश सत्तेच्या विरोधात असहकार आंदोलनात भाग घेतला. त्यामध्ये त्यांना पुण्यातील येरवाडा येथे तुरुंगवास सोसावा लागला. तेथे त्यांनी अखंड सोऽहं साधना केली. त्यामुळे त्यांच्या देहाचे व मनाचे आमुलाग्र परिवर्तन झाले. कारागृहातच त्यांना एस.एम.जोशी, अच्युतराव पटवर्धन, शंकरराव देव यांसारखे त्यांचे सहाध्यायी स्वामी म्हणून संबोधू लागले. तेथून पु्‌न्हा पावस येथे आल्यावर त्यानी अभंग ज्ञानेश्वरी, भावार्थ गीता, अमृतानुभव यांसारखी अनेक ग्रंथ संपदा निर्माण केली. एके ठिकाणी त्यांनी! मृत्यु पावलो आम्ही! या शब्दांत स्वतःच्या मृत्युचा अनुभव तारखेनीशी नोंवला आहे. भगवान विष्णुंचे त्यांना साक्षात दर्शन झाले होते. १५ ऑगस्ट १९७४ रोजी स्वामीजी समाधिस्थ झाले. त्याच जागी आज भव्य मंदिर उभे आहे. मंदिर अतिशय सुंदर आणि कमालीचे स्वच्छ आहे. मनाला अंतर्मुख करणाऱ्या प्रगाढ शांतीचा अनुभव त्या वातावरणात येतो. स्वामीजींचे चैतन्य रुपात अखंड वास्तव्य तेथे आहे असे मानले जाते. मंदिरात भक्तनिवास व प्रसादाची सोय आहे. गावात गणेश मंदिर,नदी पलिकडे विवेश्वर व सोमेवर ही शिव मंदिरेही आहेत.

  हरजी भाटकर चौपाटी

        रत्नागिरी शहरातून भाट्ये खाडी पुलावरुन जाताना दोन्ही बाजूनी मोठे नयनरम्य दृश्य दिसते. भाट्ये गावच्या समुद्रकिनार्‍याला हरजी भाटकर चौपाटी असे नाव आहे. चौपाटीवरुन दिसतो समोर पसरलेला अथांग सागर व त्यामध्ये घुसलेल्या टेकडीवरील रत्नदुर्ग किल्ला, त्यावरुन उंचावणारा दिपस्तंभ, त्याखाली दिसते ते मांडवी बंदर पाण्यात खोलवर गेलेला बोटींचा धक्का आणि समुद्र किनार्‍यावरच्या काळपट रेतीमुळे काळे दिसणारे पाणी म्हणजे काळा समुद्र. तर भाट्ये खाडीच्या बाजूस गर्द झाडीतून वाहणारी काजळी नदी, पुलाखालचं राजिवाडा बंदर, त्यातून डोकावणारे काशीविश्र्वेश्र्वराचे मंदिर आणि त्या मागे उंच टेकडीवरचा थिबा पॅाइंट व नव्याने उभारलेले जिजामाता गार्डन सार कसं एका नजरेत न सामावणारं.

  श्री झरी विनायक मंदिर

        रत्नागिरीतून पावसकडे जाताना भाट्ये गावात रस्त्यालगत झरी विनायक नावाचे जुने स्थान आहे. येथे डोंगरकुशीतून वहाणारे निर्मळ झरे आहेत. त्या ठिकाणी एका झऱ्याच्यावरच्या बाजूस खडकातून कोरुन काढलेला विनायक म्हणजे गणपतीची प्रतिमा आहे. झऱ्याच्या काठचा म्हणून झरी विनायक असे नामकरण झाले.