परिसरातील प्रेक्षणीय स्थळे

परिसरातील प्रेक्षणीय स्थळेकिनारपट्टीच्या या परीसरात अनेक प्रेक्षणीय स्थळे लपलेली आहेत. नैसर्गिक सौंदर्याने नटलेली मंदिरे आणि ऐतिहासिक महत्व असलेली अनेक ठिकाणे परीसरामध्ये पहायला मिळतात.

  केशवसुत स्मारक

        आधुनिक मराठी कवितेचे जनक कविवर्य केशवसुत! त्यांचे पूर्ण नाव श्री. कृष्णाजी केशव दामले. त्यांचा जन्म १५ मार्च १८६६ रोजी मालगुंड या गावी झाला. काही ठिकाणी ही जन्मतारीख ७ ऑक्टोबर १८६६ अशीही नोंदवलेली आढळते. उरनिर्वाहासाठी त्यांनी शिक्षकी पेशा पत्करला होता. कविता आणि काव्य त्यांच्या रोमारोमात भिनलेले होते. दापोली तालुक्यातीन वळणे गाव म्हणजे त्यांचे आजोळ. तेथेही काही काळ त्यांचे वास्तव्य होते.

        आपल्या अल्प अशा ३९ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी फक्त १०३ कविता लिहिल्या. पण त्या कविता साहित्यात अजरामर झाल्या आहेत. तुतारी, नवा शिपाही या कविता विशेष प्रसिद्ध आहेत. दि. ८ मे १९९४ रोजी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पुढाकाराने त्यांच्या मुळ घराचे स्मारकात रुपांतर झाले. त्याचे उद्घाटन कविवर्य कुसुमाग्रज यांचे हस्ते झाले. त्या प्रसंगी त्यांनी हे स्मारक म्हणजे मराठी कवितेचे तीर्थक्षेत्र आहे आणि मालगुंड ही मराठी कवितेची राजधानी आहे, या शब्दात गौरव व्यक्त केला. सन १९०५ मध्ये कविवर्य केशवसुत यांचा मृत्यु झाला. आज या स्मारकामध्ये दोन मोठी दालने असुन एकात ग्रंथालय, वाचनालय व अभ्यासिका यांचा समावेश आहे, तर दुसऱ्या दालनामध्ये प्रसिद्ध मराठी कवींच्या कवितांचे संग्रहालय, त्या कवींचा परिचय करुन देणारे फलक, काव्यसंर्भालय आदी प्रर्शनीय स्वरुपात मांडलेले आहे. शेजारच्या कविवर्य केशवसुतांच्या मूळ कौलारु घरात काही जुनी भांडी व इतर वस्तु काचेच्या पेटीत ठेवलेल्या आहेत. शे-शंभर वर्षापुर्वीच्या या तांब्यापितळ्याच्या वस्तू कित्येकांना माहीत देखील नसतील. पंचपाळे, तस्त, मूदपात्र इत्यादी कालबाह्य झालेली भाांडी आवर्जून पाहावीत. कोकण मराठी साहित्य परिषेच्या पुढाकाराने मालगुंडच्या कवी केशवसुतांच्या घराचा कायापालट झाला.

  ओंकारेश्र्वर मंदिर

        मालगुंड एस.टी. स्टॅन्डशेजारच्या रस्त्यावरुन सुमारे १ कि.मी.अंतरावर हे पेशवेकालीन स्थान आहे. पेशव्यांचे सरादार बळवंतराव मेहेंळे मालगुंडचे. पानिपतच्या युद्धात त्यांना वीरमरण आले. त्यांच्या स्मरणार्थ पेशव्यांनी त्यांच्या या मूळ गावी इ.स. १७६५ मध्ये हेमाडपंती शैलीचे हे मंदिर उभारले. मंदिराची बाह्य रचना पुण्याच्या ओंकारेश्र्वर मंदिरासारखी आहे. गाभाऱ्यामध्ये सहसा न आाळणारे शिवपंचायत म्हणजे लक्ष्मीकेशव, पार्वती, गणपती, सप्तअश्वारूढ सूर्यमूर्ती आणि मध्यभागी शिवपिंडी आहे. सभोवताली पटांगण असून नऊ माळ्याचे त्रिपूर म्हणजे दिपमाळ आहे. तसेच बाजुला मेहेंळे कुलाची कुलस्वामिनी श्री मुसळा देवीचेही मंदिर आहे. मध्यंतरीच्या काळात पडझड होऊन विस्मृतीत गेलेले हे मंदिर मालगुंडच्या आणि पुण्याच्या मेहेंळे कुटुंबियाच्या आठवणी मिरवत उभी आहे.